कोल्हापूर : प्रतिनिधी
घाटगे यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या घाटगेंनी आता पुन्हा ‘कमळ’ हाती घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
घाटगेंच्या या पुनरागमनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षााचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, घाटगे हे मुळात भाजपचेच होते आणि फक्त तिकिटासाठी राष्ट्रवादीत आले होते. आता त्यांची परतफेरी ही केवळ वैयक्तिक राजकीय सोय नसून मोठा राजकीय संकेत आहे. विशेषत: कोल्हापूरमधील नेते हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाजप स्वबळाच्या तयारीत – शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, घाटगेंना पुन्हा भाजपमध्ये घेणे म्हणजे मित्रपक्षांना स्पष्ट संदेश देणे आहे. भाजप येत्या काळात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौ-यात दिलेला स्वबळाचा संदेश आता प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षांनीही या घडामोडी गांभीर्याने घ्याव्यात, असे शिंदेंनी सूचित केले.
संघटनात्मक बदलांचा आढावा
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभर बैठकांचे आयोजन केले जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत विविध सेलच्या बैठका घेतल्या जात असून कार्यकर्त्यांची नव्याने नियुक्ती केली जात आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवरील संघटनात्मक बदलांचा आढावाही घेतला जात आहे. आगामी काळात राज्यभर दौरे करून विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू असल्याचे शिंदेंनी सांगितले.
घाटगे खिडकीला लटकून जात आहेत – सतेज पाटील
दरम्यान, काँग्रेसकडूनही या घडामोडींवर प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घाटगेंच्या भाजप प्रवेशावर टोला लगावला. भाजपच्या गाडीत जागा नाही, तरीही घाटगे खिडकीला लटकून जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. घाटगेंच्या पुनरागमनामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

