31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांचे दु:ख पाहून माझा आत्मा अस्वस्थ

शेतक-यांचे दु:ख पाहून माझा आत्मा अस्वस्थ

पुणे : काही वर्षांपूर्वी शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. आता त्यांनी राज्यात एक भटकता आत्मा अस्वस्थ आहे, तो गेली ४५ वर्षे महाराष्ट्र आणि इथल्या राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हटले. खरेच माझा आत्मा अस्वस्थ आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही. शेतक-यांची दु:ख पाहून अस्वस्थ होत असेल तर त्यात काही गैर नाही. सध्या देशात लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यासाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी मोदींना दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एका बड्या नेत्याने ४५ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सुरू केलेल्या खेळाने महाराष्ट्रात अस्थिरतेचा कालखंड सुरू झाला. त्यामुळे अनेक मुख्यमंत्री आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. या ‘भटकत्या आत्म्या’ने १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला; तसेच २०१९ मध्येही राज्याच्या जनादेशाचा अवमान केला.

आता देशही अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याला शरद पवार यांनी जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि पदाधिका-यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मोदींविरोधात संताप व्यक्त केला.

दरम्यान, सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, ही शिकवण आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे, तसे संस्कार त्यांनी आमच्यावर केले आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असेही पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR