32.8 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeधाराशिवप्रत्येक घरात, प्रत्येक शेतात पाणी पोचविणे हे माझे ध्येय

प्रत्येक घरात, प्रत्येक शेतात पाणी पोचविणे हे माझे ध्येय

प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचा विकास करण्यासह सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच मागील १० वर्षांत ७५ लाख कुटुंबांना नळाचे कनेक्शन दिले. आता प्रत्येक घरात आणि प्रत्येक शेतात पाणी पोचविणे हेच माझे ध्येय असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. कॉंग्रेसच्या काळात फक्त विश्वासघात झाला. शेतीपर्यंत पाणी पोचविण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली. मोदी समस्या टाळत नाही, समस्यांना भिडतो. त्यामुळे घराघरांत, शेतीत पाणी पोचविले जाईल, असे ते म्हणाले.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव-तुळजापूर हायवे लगत गेस्ट हाऊस समोरील मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. विविध क्षेत्रात गेल्या ६० वर्षांमध्ये काँग्रेसने जे केले नाही, ते भाजप प्रणित सरकारने केले असल्याचे सांगत भरड धान्यामध्ये भारताला आत्मनिर्भर बनविणार असल्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारताच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. तुम्ही दहा वर्षांपूर्वीचा भारत पाहिला आहे आणि आताचा भारत पाहात आहात. आज जग भारताला ओळखत आहे. गगनयानला अंतराळात पाठवण्याची तयारी करणा-या भारताला जग ओळखत आहे. कोट्यवधी लोकांचा कोरोना काळात जीव वाचवणा-या भारताला जग ओळखत आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ला करून पळून जायचे. त्यावेळी काँग्रेस जगासमोर वाचवा म्हणून रडायची. कमजोर काँग्रेस सरकार बनवू शकत नाही. काँग्रेसने फक्त विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, राजेंद्र राऊत, सतीश चव्हाण, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, ऍड. मिलिंद पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, रिपाइंचे राजाभाऊ ओव्हाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंखे, सुनील चव्हाण, नितीन काळे, दत्ता कुलकर्र्णी, ऍड. व्यंकटराव गुंड, सुरेश पाटील, नंदाताई पुनगुडे, अस्मिता कांबळे, धनंजय सावंत, सुनील चव्हाण यांच्यासह उमेदवार अर्चनाताई पाटील उपस्थित होते.

१० वर्षांत मोठा बदल
शक्तिशाली भारत व विकसित भारत करण्यासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असून १० वर्षांपूर्र्वी व आताचा भारत यामध्ये मोठा बदल झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे सांगत अर्चनाताई पाटील यांना मत म्हणजे थेट मोदींच्या खात्यात मत असल्याचे सांगत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

डाळी, तेलात देशाला आत्मनिर्भर बनविणार
एनडीए सरकारने काँग्रेस सरकारच्या तुलनेत १० पट जास्त पैसे दिले. हा केवळ ट्रेलर असून आता मोदींचे मिशन, हे देशाला डाळी आणि तेलात देशाला आत्मनिर्भर बनवणार असल्याचे मोदींनी म्हटले. देशाला दाळ आणि तेल खरेदी करण्यासाठी आमचा देश हजारो कोटी रुपये विदेशात पाठवतो, आता हा पैसा थेट शेतक-यांच्या खिशात जाईल, असे म्हणत मोदींनी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना साद घातली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR