मुंबई/पुणे : मान्सूनचा विलंब आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून धरणांतील उपयुक्त जलसाठा सरासरी अवघ्या २३ टक्क्यांवर आला आहे. राज्यातील २० जिल्ह्यांतील हजारो गावे व वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर राजधानी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्येही केवळ ९ टक्क्यांवर पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरावर ३० टक्के पाणीकपातीचे सावट आहे.
राज्यातील लहान-मोठ्या धरणांमध्ये केवळ २३ टक्केच पाणी शिल्लक आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत (२८ टक्के) खूपच कमी आहे. जलस्रोतांनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खेड तालुक्यातील ११ गावांसह एकूण १७ गावांतील १११ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाईचे सावट असून, सुमारे २७ हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच आधार राहिला आहे. प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून पाच अधिग्रहित विहिरींमधून १४ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र, टँकरना १० ते ३० किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये पाणी पोहोचवावे लागत असल्याने पुरवठ्यात विलंब होत असून, नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. पाणीटंचाईचा फटका पशुपालकांनाही बसत आहे.
जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीपर्यंत नेणे आणि पाणी उपसण्याचे काम दिवसभर करावे लागत असल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांसह शालेय पोषण आहारासाठीही पाण्याचे जार विकत घेण्याची वेळ अनेक शाळांवर आली आहे. दरम्यान, भामा-भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने अनेक सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पाझर तलाव कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे.
धरणांतील पाणीसाठा चिंताजनक
राज्यातील प्रमुख जलस्रोतात सध्या अवघा ५.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १.३८ टीएमसी क्षमतेपैकी केवळ ०.४२ टीएमसी जिवंत साठा उपलब्ध असून, गतवर्षी याच काळात हा साठा १५.४१ टक्के होता. कळमोडी धरणात १६.३४ टक्के पाणीसाठा असून, ०.२५ टीएमसी क्षमतेपैकी ०.२४ टीएमसी जिवंत साठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ३६.४२ टक्के होता. भामा आसखेड धरणात तुलनेने २९.६४ टक्के पाणीसाठा असून, २.७५ टीएमसी क्षमतेपैकी २.२७ टीएमसी जिवंत साठा उपलब्ध आहे. गतवर्षी याचवेळी येथे १७.३५ टक्के पाणीसाठा होता.
पावसाअभावी शेतीची कामे रखडली
रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतीच्या पूर्वमशागतीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रा नक्षत्रातही समाधानकारक पावसाची चिन्हे नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. पश्चिम भागातील सह्याद्री पर्वतरांग व भीमाशंकर अभयारण्य परिसरात मान्सूनपूर्व पावसानंतर धुळवाफ्यावर टाकलेली भात रोपे जगवण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरू आहे. पावसाने अद्याप पाठ फिरवल्याने नागरिक, पशुपालक आणि शेतकरी तिघांनाही संकटाचा सामना करावा लागत असून, लवकरच दमदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईची स्थिती
मुंबईवरील संकट टळण्यासाठी पुरेसा पाऊस न पडल्यास जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचेल.
ग्रामीण भागातही टंचाई
नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
















