मुंबई : इमरान हाश्मी आणि दिशा पाटनी यांच्या बहुप्रतिक्षित ‘आवारापन २’ या चित्रपटाची चर्चा आहे. २००७ मधील कल्ट क्लासिक चित्रपट आवारापनचा हा सिक्वेल आहे. निर्माता विशेष भट यांनी गुरुवारी चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली. या चित्रपटात शबाना आझमी नफिसा नावाच्या पात्रात दिसणार असून, त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीतील ही पहिलीच खलनायिकेची भूमिका असेल.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये विशेष भट शबाना आझमी यांना केक भरवताना दिसत आहेत. तसेच, शबानाजी गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या प्रोजेक्टमध्ये सामील झाल्याचा खुलासाही त्यांनी केला. त्यांच्या येण्याने चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये एक मोठी पडली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शबाना आझमी या १८ सप्टेंबर २०२५ रोजी (त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी) अधिकृतपणे या चित्रपटाशी जोडल्या गेल्या. विशेष भट यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले. नफिसाची भूमिका फक्त आणि फक्त शबानाजी करू शकत होत्या… गेल्या वर्षी त्या त्यांच्या वाढदिवसा दिवशी आमच्या घरी आल्या आणि सर्व गोष्टी अगदी योग्य ठिकाणी जुळून आल्या.
आवारापन २ बद्दल सांगायचे तर या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कक्कर आहेत. बिलाल सिद्दिकी यांनी लेखन केलं असून विशेष भट यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट टक्कर सनी देओलच्या बटावारा १९४७ या चित्रपटाशी होईल.
















