40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच? : राज ठाकरे यांचा दावा

शरद पवार आणि अजितदादा आतून एकत्रच? : राज ठाकरे यांचा दावा

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असे मी मानतच नाही. शरद पवार यांनी निवडून येणा-या लोकांची बांधलेली ती मोळी आहे, असे माझे मत आहे, असा दावा करतानाच शरद पवार आणि अजित पवार हे आतून एकत्रच आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन होता. यावेळी राज ठाकरे यांची तोफ धडाडली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, नाट्यसंमेलनात पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. पण कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. पण सर्व आले होते एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही सर्व आतून एकच आहेत. शरद पवार आणि अजितदादा आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे. मूर्ख बनवलं जात आहे. त्यांचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राची माती होते. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं आहे, असं राज म्हणाले.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मी गेलो होतो. मी त्यांना सरळ सांगितलं हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाही. टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा मोर्चे निघाले होते. सर्व मुंबईत आले. काय झालं पुढे? मराठा बांधवांना हीच विनंती आहे, यांच्या भुलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याची आश्वासने दिली जात आहेत, असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचे सरकार कसे हिंदुत्ववादी
उद्धव ठाकरे यांचे सरकार हे डरपोक सरकार होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आम्ही भोंग्यावर बोललो. त्यांनी १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे म्हणे हिंदुत्ववादी. या भोंग्यांचा मुस्लिमांना त्रास होतो. काल मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो. आंदोलन झाल्यावर भोंगे बंद झाले. पण सरकारच ढिल्लं पडलं. एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे पुन्हा भोंगा लावण्याची, असे राज ठाकरे कडाडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR