नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला राज्यात मोठा फटका बसला होता. राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागांवरच महायुतीला विजय मिळवता आला. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली तर शिंदेंच्या शिवसेना पक्षाला ७ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे केंद्रातील एनडीए सरकारच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रीपद देण्यात आले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारने वेटिंगवर ठेवले होते.
मात्र, आता विधानसभेतील यशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केंद्रातील मंत्रिपदाचा मार्गही मोकळा झाला आहे. राज्यातील मुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाची खाती देण्यात येतील, असे समीकरण पुढे आले आहे. यासोबत दोन्ही पक्षांना केंद्रातही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद देण्यात येईल. त्यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना शिंदे गटालाही केंद्रात आणखी एक मंत्रिपद दिले जाणार आहे. त्यानुसार खासदार श्रीकांत शिंदे हे मंत्री होतील, अशी सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच केंद्रातील भाजपकडून शिवसेना व राष्ट्रवादीला केंद्रात स्थान देऊन नाराजी दूर केली जाणार असल्याचे समजते.