नवी दिल्ली : भारताच्या माजी अंडर १९ क्रिकेटरला शुक्रवारी श्रीलंकेच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केली. तो एका खेळाडूला लाच देत असताना पकडला गेला असून त्याला मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. ही अटक श्रीलंका प्रीमियर लीग स्पर्धेचा सहावा सीझन सुरू होण्याच्या काही तास आधी करण्यात आली.
श्रीलंका प्रीमियर लीगमधील या भ्रष्टाचार प्रकरणी संशयितांमध्ये मनजोत कालराचा सुद्धा समावेश आहे. मनजोत कालरा याने २०१८ च्या १९ वर्षांखालील (अंडर १९) क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. मनजोत कालरा हा शुभमन गिलचा पूर्व सहखेळाडू राहिलेला आहे. त्याला क्रीडा संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नेमलेल्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आणि त्यानंतर दंडाधिका-यांसमोर हजर केले.
२७ वर्षांच्या मनजोत कालराने क्रीडा क्षेत्रातील उद्योजकतेकडे पाऊल टाकून वर्षाच्या सुरुवातीला ‘जाफना किंग्ज’ फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक केली होती. श्रीलंकेच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या स्पर्धेच्या संदर्भात एका खेळाडूला आर्थिक आमिष दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कालरा याच्यावर आहे. तपास अधिका-यांनी सांगितले की, सुमारे १० दिवसांपूर्वी संपर्क साधला गेल्यानंतर संबंधित खेळाडूने दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी ही अटक करण्यात आली. श्रीलंकेचे खेळाडू भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो आणि दुनिथ वेल्लालगे यांनी ही तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. हे तिन्ही खेळाडू ‘जाफना किंग्ज’ या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करतात.
















