दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे. पालकमंत्रिपद येण्याआधीच त्यांनी या जिल्ह्याची ओळख बदलण्यासाठी जगाच्या नकाशावर पोहचवण्यासाठी मोठे स्वप्न पाहिले होते. आता ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे.
गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्याअनुषंगाने मंगळवारी दावोसमध्ये महत्वाचा करार करण्यात आला आहे. दावोस येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खरह ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांच्या सोबत ३ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करारावर सही केली. या महत्त्वपूर्ण कराराअंतर्गत गडचिरोलीत अत्याधुनिक, ग्रीन २५ मिलियन टन स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्यासह रोजगारनिर्मितीसह अनेक बाबतीत हा करार महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटीवर लक्ष, इलेक्ट्रिक बस, ट्रक आणि परवडणा-या ईव्हीएस, पेट्रोल पंपांवर फास्ट चार्जिंग सुविधा आणि राज्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कचे पुनर्मूल्यांकन, विविध क्षेत्रात १०,००० लोकांसाठी रोजगार निर्मिती अशा महत्वपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक होणार असल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगती, नवीकरणीय ऊर्जा आणि रोजगार निर्मितीसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिलायन्ससोबतही करार
महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरर यांच्यात १६,५०० कोटींचा करार झाला. संरक्षण क्षेत्रात रत्नागिरी येथे होणा-या या प्रकल्पामुळे २४५० रोजगार निर्माण होतील. ईव्ही बॅटरी आणि महाराष्ट्रातील २४७४ ऊर्जेच्या दृष्टिकोनावर कंपनीसोबत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सामंत यांनी दिली.