नागपूर : येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीने कूलरची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या अन्यायाबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रकाशित होताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व गोंधळलेल्या समाज कल्याण विभागाने हस्तक्षेप करीत त्या विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्याचा आदेश स्थगित केला.
अमरावती जिल्ह्यात राहणारी आकांक्षा प्रकाश उके या विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला होता. ती बेसा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात राहून एमबीएचे शिक्षण घेत आहे. गेल्या महिन्यात आकांक्षाने भीषण उष्णता असूनही वसतिगृहात कूलरसारख्या मूलभूत सुविधा नसल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.
बावनकुळेंच्या शब्दाचा कधीपर्यंत मिळेल आधार?
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकांक्षाला वसतिगृहात राहण्याचा शब्द देत तूर्तास तिला दिलासा दिला असला, तरी तिच्यावर परीक्षेनंतर कारवाई होईलच असे बोलले जात आहे. सूत्राच्या माहितीनुसार ती प्रशिक्षणार्थी असल्याचे सांगत असली तरी ती टीसीएस कंपनीत जॉब करते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
















