22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडनीट विरोधात विद्यार्थी रस्त्यावर

नीट विरोधात विद्यार्थी रस्त्यावर

नांदेड : प्रतिनिधी
वैद्यकीय, आयआयटीसह अन्य अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून यामुळे वर्षभर अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी तसेच नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आज मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.

वैद्यकीय, आयआयटीसह अन्य अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा आवश्यक असल्याने यासाठी देशभरातून यावर्षी २४ लाखावर विद्यार्थी बसले होते. करिअरचा टर्निंग पॉईंट असलेल्या या परीक्षेची तयारी शालेय स्तरापासून केली जाते. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याला डॉक्टर करण्यासाठी आयुष्यभरात कमावलेला पैसा खर्च करण्याची तयारी ठेवतात. असे असताना एनटीएच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदा मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडला आहे.

आत्तापर्यंत या परीक्षेमध्ये बोटावर मोजण्याइतकी मुले पैकीच्या पैकी गुण घेत असत. परंतु यावर्षी मात्र ६७ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ७२० गुण मिळविले. अन्य राज्यातील एका केंद्रावर एका हॉलमध्ये रांगेत बसलेल्या ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ७२० गुण मिळाले. काही ठिकाणी केंद्रावर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्सच्या नावाखाली गुणदान करण्यात आल्याचा प्रकारही घडला असून तो मेहनतीने यश मिळविणा-या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे एनटीने घेतलेल्या परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

या मोर्चात आयआयबीचे बालाजी पाटील, अब्दुल बारी, बालाजी गाडे, पीटीए संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा.आर.बी. जाधव, पीटीए संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज अटकोरे, सीसीटीएफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.नागेश कल्याणकर, उपाध्यक्ष साईकिरण सलगरे यांच्यासह बहुतांश कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी व संचालक सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR