एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण मानवजातीपुढे सर्वांत मोठे आव्हान बनलेल्या जागतिक तापमानवाढीबाबत सबंध जगभरातील पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता आहे. तथापि, तापमानवाढीचे मुख्य कारण असणारे वायुप्रदूषण रोखण्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीय्त. उलटपक्षी, विकासाच्या लालसेपोटी आणि आधुनिकतावाद, चंगळवाद यामुळे बदललेल्या जीवनशैलीच्या गरजा भागवण्यासाठी सुरू असलेल्या गोष्टींमुळे वायुप्रदूषण दिवसागणिक वाढत चालले आहे. विशेषत: देशातील आणि जगभरातील महानगरे-शहरे येथील स्थिती अधिक भयावह होताना दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषित हवेमुळे तेथील नागरिकांचे जगणे अस झाल्याची चर्चा देशभरात नव्हे तर जगभरात झाली. परंतु अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन महानगरांमधील हवा दिल्लीहून अधिक खराब झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १४६ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १७८ वर गेल्याचे यामधून दिसून आले आहे.
वायुप्रूषणाबरोबरच भारतीय शहरांमध्ये धूलिकणांचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत मुंबईमध्ये अलीकडेच एक प्रयोग करण्यात आला. पॉलिहाऊसमध्ये विशेषत: ऑर्किडचे कल्टिवेशन असणा-या ग्रीनहाऊसमध्ये हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगर बसवलेले असतात. कारण ऑर्किड हवेतील बाष्प शोषून घेत असल्यामुळे तेथील हवेचे तापमान वाढते. हे फॉगर धुके तयार करतात. अशा प्रकारचे फॉगर मुंबईमध्ये काही ठिकाणी बसवण्यात आले होते आणि त्यातून धुके तयार करण्यात आले. या धुक्यामुळे हवेतील धुळीचे कण खाली बसण्यास मदत झाली. हिवाळ्यामध्ये धुके पडते तेव्हा या दाट थरामध्ये स्मॉग तयार होतो. स्मॉग म्हणजे दूषित हवा आणि आर्द्रता यांचे मिश्रण. हा स्मॉगचा थर श्वसनासाठी अत्यंत घातक असतो.
आपल्याकडे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते. कारण रस्त्यांवर सर्वाधिक प्रमाणात धूळ तयार होते. आज सबंध देशभरात रस्तेविकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अंतर्गत रस्ते असोत किंवा महामार्ग असोत यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज देशातील सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची स्थिती बिकट आहे. अशा खराब रस्त्यांवरून वाहने गेल्यामुळे धूळ हवेत पसरत आहे. आज पावसाळा संपून इतके दिवस उलटूनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. नागरिकांनी तक्रार केली तर दुरुस्ती म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त खडी टाकली जाते. पण अशा बुजवलेल्या खड्ड्यांवरून वाहने गेल्यानंतर त्यातील धूळ हवेत पसरते. वास्तविक, खराब झालेल्या रस्त्यांचे लागलीच डांबरीकरण केले पाहिजे; पण ते केले जात नाही. धूलिकणांचे प्रमाण वाढण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे वाढती बांधकामे. आज देशातील प्रत्येक शहरात घरबांधणीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महानगरांमध्ये जुनी घरे, इमारती पाडून रिडेव्हलपमेंट करण्याचे प्रमाण अधिक आहे. यातूनही हवेतील धुळीचे प्रमाण वाढत आहे.
याखेरीज वायुप्रदूषण वाढण्यास वाढती वाहनसंख्या आणि त्यांचा अतिवापर हे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणून पुढे आले आहे. गेल्या चार ते पाच दशकांचा विचार करता अलीकडील काळात देशातील वाहनांच्या संख्येने खूप मोठी उडी घेतल्याचे दिसते. २०१९ ते २०२२ या काळात देशात दोन कोटींहून अधिक नव्या वाहनांची नोंदणी झाली. आज देशातील दुचाकींचा आकडा २१ कोटींहून अधिक आहे; तर चारचाकींचा आकडा ७ कोटींहून अधिक आहे. याखेरीज हायब्रीड वाहनांची संख्या सुमारे १७ लाख इतकी आहे. २००९ मध्ये भारतीय वाहनउद्योगाने एकूण २६ लाख वाहनांची निर्मिती केली होती. कोविडोत्तर काळात वाहनउद्योगाने घेतलेली भरारी पाहिल्यास आज देशात विक्रमी पातळीवर वाहनांची विक्री होत आहे. एका पाहणीनुसार २०५० पर्यंत भारतीय रस्त्यांवर ६१.१ कोटी वाहने धावताना दिसतील आणि ही संख्या जगातील सर्वाधिक वाहनसंख्या असेल. या वाढत्या वाहनसंख्येवर शासनाचे कसलेली नियंत्रण नाही. उलट वाहनसंख्या वाढत चालल्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले म्हणून शासन झाडांच्या कत्तली करून रस्त्यांची निर्मिती व विकास करत आहे.
सप्टेंबर महिन्यात भारतातील वाहन विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २० टक्क्यांनी अधिक असून हा आकडा १८.९ लाखांवर पोहोचला आहे. आज एकट्या पुण्यामध्ये ४४ लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर दररोज धावत आहेत. ७० लाख लोकसंख्या असणा-या या शहरात नोंदणी न झालेल्या वाहनांची संख्याही मोठी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहने वाढणार असतील तर शुद्ध हवा कशी मिळणार? चारचाकी वाहनांमधील व्यक्ती काचा बंद करून एसीमध्य बसलेल्या असतात. पण त्या वाहनातून होणा-या विषारी वायूउत्सर्जनाचा त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे.
हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषण्याचे काम झाडांकडून केले जाते. धूळ झाडांकडून शोषली जात नसली तरी ती पानांवर चिकटून राहते. त्यामुळे झाडांमुळे धुळीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण करून झाडे ऑक्सिजन देत असतात. असे असताना आज महानगरांच्या बाजूला झाडांची संख्या किती आहे? पुणे-बंगळुरू महामार्गाचा विचार केल्यास हा रस्ता तयार करत असताना हजारो जुने, डेरेदार, सावली देणारे वृक्ष तोडण्यात आले. रस्तानिर्मितीनंतर बाजूला पुन्हा रोपांची लागवड करण्यात आली; पण २०-२२ वर्षांनंतर ही वाढलेली झाडे रुंदीकरणासाठी पुन्हा तोडण्यात आली. चौपदरी, सहा पदरी, आठ पदरी, बारा पदरी अशा मार्गाने रस्तेविकास करताना कार्बन शोषणा-या झाडांचा विचारच केला जात नाही.
आज प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वाहनसंख्या वाढल्यामुळे रस्तेविकास करण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे विकासाच्या नावाखाली विस्तारीकरण केले जात आहे. रस्त्याकडेला झाडे लावण्यासाठी जागा नसल्यामुळे आता एक नवे फॅड निर्माण झाले आहे. अनेक शहरांमध्ये मोकळ्या भिंती, चौक किंवा फ्लायओव्हरच्या भिंतींवर व्हर्टिकल फार्मिंग केले जात आहे. वास्तविक, ही संकल्पना प्रचंड महागडी असून त्याचा मेंटेनन्सही खूप आहे.