21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeसंपादकीय विशेषनिमित्त... इंटरनेट दिनाचे

निमित्त… इंटरनेट दिनाचे

संपूर्ण जगभरात २९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरनेट दिन म्हणून साजरा होतो. सुमारे ५४ वर्षांपूर्वी म्हणजेच २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरील पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. आज संपूर्ण जगभरातील बहुतांश लोकसंख्येचे इंटरनेटशिवाय पानही हलत नाही, अशी स्थिती आहे. इंटरनेटने जग जवळ आणले आहे. जगाच्या कोणत्याही कोप-यात घडणा-या घटनेची माहिती एका क्लिकद्वारे झटक्यात मिळू लागली आहे. पूर्वी एखाद्या गोष्टीचे संदर्भ शोधायचे असतील तर त्यासाठी पुस्तकांची संग्रहालये पालथी घालून पुस्तकांचा शोध घ्यावा लागे आणि त्यातील माहिती वाचून संदर्भ गोळा करावे लागत असत. आज इंटरनेटमुळे तशी परिस्थिती राहिलेली नाही. कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर इंटरनेटवरील मायाजालात त्याविषयी नोंदी टाकल्या की क्षणात माहितीचा साठा उपलब्ध होतो. इंटरनेटमुळे माहितीचा अजस्त्र स्रोत तर खुला झाला आहेच; पण, त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींचे जाळे विणून ते अधिक घट्ट करण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ लागला आहे.

संगणकाचा शोध लागल्यानंतर १९६० च्या दशकापर्यंत मोठ्या प्रयोगशाळा आणि संरक्षण संस्थामध्ये संगणक वापरण्यात येत होते. संगणकाच्या मदतीने अवघड आकडेमोड करणे आणि महत्त्वाची माहिती पाठवणे हा हेतू होता. मात्र, या माहितीचे हस्तांतर करणे जिकिरीचे होऊ लागले तेव्हा दूरवरच्या संगणकांना एका दुव्यात जोडणा-या नेटवर्कची गरज भासू लागली. या गरजेतूनच अमेरिकेत १९६९ मध्ये ‘अर्पानेट’चा उगम झाला. यातून सुरुवातीला लॉस एंजिल्सचे कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि स्टॅन्फर्ड संशोधन संस्था यांचे संगणक जोडण्यात आले. यातच पुढे, उराह विद्यापीठही समाविष्ट करण्यात आले. ‘अर्पानेट’च्या कार्यक्षमतेपुढे, या नेटवर्कमधील सदस्यांची संख्या वाढू लागली. दर वीस दिवसाला एक याप्रमाणे १९८१ पर्यंत ‘अर्पानेट’नेटवर्कची संख्या २१३ पर्यंत पोहोचली. अर्पानेट म्हणूनच इंटरनेटची सुरुवात मानण्यात येते.‘अर्पानेट’च्या कार्यक्षमतेपुढे इतरही देशांमध्ये अशाच तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. यानंतर ‘कॉम्प्युसर्व्ह’ ‘अमेरिका ऑनलाईन’ फिडोनट अशी अनेक नेटवर्क उदयास आली आणि यातून पर्सनल कॉम्प्युटरपर्यंत नेटवर्कची सुविधा मिळण्यास सरुवात झाली. हीच इंटरनेटच्या उगमाची सुरुवात मानण्यात येऊ लागली.

इंटरनेटच्या उदयाबरोबरच असंख्य वेबसाईट उदयास आल्या. यामध्ये सर्च इंजिन्सनी आघाडी घेतली. सुरुवातीला १९९५ मध्ये याहू हे सर्चइंजिन अल्पावधितच लोकप्रिय झाले होते. मात्र, १९९९ मध्ये गुगलचा जन्म झाला आणि सर्च इंजिनवर गुगलचे साम्राज्य सुरू झाले. आजमितीला या व्यवसायातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक व्यवसाय एकट्या गुगलचा आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे रेडीफ, बिंगो, अशी अनेक सर्च इंजिन उपलब्ध आहेत. मात्र सहज आणि सोपी शैली, प्रचंड वेग यामुळे गुगलची लोकप्रियता सर्वोच्च स्थानी आहे. केवळ माहितीच्या हस्तांतरासाठी उदय झालेले इंटरनेट आता एक मोठा व्यवसाय बनले आहे. सर्वाधिक लोक वापरत असणारी आणि सहज उपलब्ध असणारी ही जगातील एकमेव सेवा आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे ‘माहिती तंत्रज्ञान युग’ अवतरले आहे. वैयक्तिक आयुष्यात बँकिंग आणि अन्य आर्थिक व्यवहारांमध्ये आलेली सुलभता-पारदर्शकता आपण दररोज अनुभवत आहोत. हातातील स्मार्टफोनच्या साहाय्याने क्षणार्धात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा इंटरनेटमुळेच उपलब्ध झाली.

आज इंटरनेटच्या जगात एक मिनिट म्हणजेच ६० सेकंदात सर्वकाही बदलते. प्रत्येक मिनिटाला फक्त अमेरिकेत ३८० नवे संकेतस्थळ सुरू होतात. फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एका मिनिटात ७१.६ दशलक्ष मेसेज फॉरवर्ड होतात. दर मिनिटाला ट्वीटरवर ८७,५०० ट्वीट पोस्ट होतात. यूट्यूबही यात मागे नाही. यूट्यूबवरचे सक्रिय यूजर्स हे दर मिनिटाला पाचशे तासांचे नवीन व्हीडीओ अपलोड करतात. इन्स्टाग्रामवर दर मिनिटाला ६,९५,००० स्टोरी शेअर होतात. दर मिनिटाला गूगलवर ३.८ दशलक्ष सर्चिंग केले जाते. त्याचवेळी दर मिनिटाला फेसबुक, यूट्यूब आणि अ‍ॅमेझॉन या शब्दांचा सर्वाधिक सर्च होतो. आता कमाईकडे जाऊ. गूगल हे एका मिनिटात १,२८,२३४ डॉलर कमावते. जीमेलचा विचार केला तर एका मिनिटात २३२.४ दशलक्षपेक्षा अधिक ईमेल जगाच्या कानाकोप-यात पाठविले जातात. याहू आणि बिंगसारख्या सर्च इंजिनवर एका मिनिटात अनुक्रमे ३,५२,१३४ तसेच ५,७४,०२६ सर्च होते. याहू देखील एका मिनिटात ९४५२ डॉलर कमावते. एका मिनिटात ७८१२ डॉलर बिंग कमावते. २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर दर मिनिटाला २८,००० ग्राहकांनी त्याच्या अ‍ॅपवर काही ना काही पाहिल्याचे सिद्ध झाले आहे. एका मिनिटात डेटिंग अ‍ॅप टिंडरवर २० लाख प्रोफाईल स्वाईप केले जाते. तसेच लोकांनी सोशल मीडियाकडे केवळ टाईमपास म्हणून पाहत नाहीत तर प्रोफेशनल नेटवर्किंगही करतात. येणा-या काळात इंटरनेटचा वेग कैकपटींनी वाढेल यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिन्सच्या आधारावर इंटरनेट सेवेत कोणकोणते बदल होतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR