कराची: पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात एका आत्मघातकी हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कराचीमधील गुलिस्तान-ए-जौहर भागात असलेल्या सिंध रेंजर्सच्या मुख्यालयाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हा भीषण हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, या आत्मघातकी स्फोटात आणि त्यानंतर झालेल्या भीषण गोळीबारात सुरक्षा दलाच्या ४ जवानांसह एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
हा हल्ला शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला. दहशतवाद्यांनी सुरुवातीला स्फोटकांनी भरलेली एक गाडी रेंजर्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वेगाने आदळली, ज्यामुळे मोठा आत्मघातकी स्फोट झाला. या स्फोटामुळे मुख्य गेट उद्ध्वस्त झाल्यानंतर दहशतवाद्यांनी परिसरात प्रवेश केला आणि हँड ग्रॅनेड फेकण्यास सुरुवात केली. यानंतर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल ९० मिनिटे तीव्र गोळीबार सुरू होता.
या चकमकीत सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर एका जखमी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे. या हल्ल्यात सिंध रेंजर्सचे ४ जवान शहीद झाले असून दहशतवादी आणि जवानांसह एकूण मृत्यांचा आकडा १० वर पोहोचला आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच अँटी-टेरर फोर्स (ATF) आणि स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या (SSU) कमांडो पथकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते, तसेच काही भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. बंदी घातलेल्या ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) या संघटनेशी संबंधित असलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी गटाने या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या घटनेमुळे कराचीसह संपूर्ण पाकिस्तानात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
















