हरिद्वार : निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीने शुक्रवारी हरिद्वारमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना उत्तर हरिद्वारमधील भूपतवाला येथे घडल्याचे सांगितले जात आहे. तब्बल १९ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शेवटच्या प्रकरणातही त्याची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला होता.
नोएडातील निठारी येथे २००५-०६ मध्ये मुले आणि महिला बेपत्ता झाल्यानंतर कोलीचे नाव समोर आले होते. २९ डिसेंबर २००६ रोजी त्याच्या कोठीमागील नाल्यात मानवी अवशेष सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर सीबीआयने तपास केला आणि कोलीवर अनेक प्रकरणांमध्ये खटले चालवण्यात आले. एकेकाळी त्याला १३ प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ प्रकरणांत त्याची निर्दोष मुक्तता केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शेवटच्या प्रकरणातही त्याला दोषमुक्त केले होते.
















