25 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeराष्ट्रीयकोकणात ठाकरे विरुध्द ठाकरे

कोकणात ठाकरे विरुध्द ठाकरे

रत्नागिरी : सिंधुदुर्ग मतदारसंघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. अशातच इच्छुक असलेले किरण सामंत हे त्यांच्या मंत्री भावावर कमालीचे नाराज झाले आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राणेंच्या मुलाचा दोनदा पराभव करून खासदार झालेले विनायक राऊत हे नारायण राणेंनाही हरवितात का, की नारायण राणे याचा बदला घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये येत्या सात मे रोजी निवडणूक आहे. यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरले आहेत. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण तापविण्यासाठी ठाकरे बंधू एकमेकांविरोधात सभा ठोकणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देण्यासाठी नारायण राणेंची प्रचार सभा घेणार आहेत. या दोघांच्या एकामागोमाग एक अशा सभा होणार आहेत.

उद्धव ठाकरेंची सभा ३ मे रोजी तर राज यांची सभा ४ मे रोजी होत आहे. उद्धव ठाकरेंची सभा आधीच ठरलेली होती. राज यांच्या पांिठब्यानंतर राणे यांनी राज यांची सभा ४ मे रोजी कणकवलीतीलच दुस-या मैदानावर ठेवली आहे. उद्धव ठाकरेंची सभा उद्या, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानात होत आहे. आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आदींनी या सभास्थळाची पाहणी केली आहे.

तर राज ठाकरेंची सभा शनिवारी नगरपंचायत मैदानावर होत आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे. राज ठाकरेंच्या सभांचा आवाका पाहता हे मैदान अपुरे पडण्याची शक्यता आहे. आता या सभेला मनसेचे कार्यकर्तेच येतात की राणे समर्थकही येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे राज यांच्यावर टीका करतात की टाळतात याच्याबरोबरच उद्धव यांनी टीका केली आणि नाही केली तरी राज हे ठाकरेंवर टीका करतात का, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाचे म्हणजे राज ठाकरेंनी यापूर्वी कधीच अशी नारायण राणेंसाठी उद्धव ठाकरेंविरोधात उघड भुमिका घेतली नव्हती. नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडलेली तेव्हा सिंधुदूर्गात राज यांनाही प्रचंड विरोध सहन करावा लागला होता. राणे समर्थकांनी त्यांच्या गाड्या अडविल्या होत्या. अखेर राज यांना माघारी फिरावे लागले होते. राज हे शिवसेनेपासून वेगळे झाले तेव्हाही राज यांनी राणेंसाठी पक्ष वेगळे असले तरी कधी प्रचार केला नव्हता. मात्र, आता ते राणेंसाठी सभा घेणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR