मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज ६ जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील आगामी टी-२० (T20i) मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच टीम इंडियाच्या टी-२० संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले असून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून, त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरची भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर युवा फलंदाज तिलक वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईतील बीसीसीआय (BCCI) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली. सचिव सैकीया यांनी दोन्ही दौऱ्यांसाठी एकाच १६ सदस्यीय संघाची घोषणा केली.
सूर्यकुमार यादवला संघातूनच डच्चू!
या निवडीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला केवळ कर्णधारपदावरूनच हटवण्यात आलेले नाही, तर त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी १६ सदस्यीय संघात स्थानही देण्यात आलेले नाही. बीसीसीआयचा हा निर्णय क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
१५ वर्षीय ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री
निवड समितीने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंवर मोठा विश्वास दाखवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल (IPL) स्पर्धेच्या १९ व्या मोसमात आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर वैभवची वरिष्ठ संघात लवकरच निवड होईल अशी चर्चा होती, त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. वैभवसोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेल्या प्रिन्स यादवसारख्या काही नव्या चेहऱ्यांनाही या संघात संधी मिळाली आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक (थोडक्यात)
टीम इंडिया सध्या मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होईल.
आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संपूर्ण भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि वैभव सूर्यवंशी.
















