पुणे : राज्यातील वाढती दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांना मिळणारी केंद्राची मदत, बारामती विमानतळाचा विकास आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू असलेले राजकारण या सर्वच मुद्यांवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सविस्तर भूमिका मांडली.
राज्यातील दुष्काळी स्थितीवर बोलताना भरणे म्हणाले, पूर्वी ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता, त्यात आता ६ तालुक्यांची वाढ होऊन ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पंचनाम्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एनडीआरएफच्या मदतीच्या हेक्टरी दरात वाढ झाल्याने आता नव्या दराने फेरप्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, केंद्राकडून लवकरात लवकर भरीव मदत मिळेल. दिवाळीपूर्वी सुमारे ९५ लाख ते १ कोटी शेतक-यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आली आहे. ई-केवायसी आणि सामाईक जमिनीच्या कागदपत्रांमुळे वंचित राहिलेल्या सुमारे १० लाख शेतक-यांच्या खात्यावरही लवकरच ही रक्कम जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना भरणे म्हणाले, अजितदादांचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून या अपघाताचे सत्य १०० टक्के समोर आले पाहिजे, असे मला वाटते. तपासाला उशीर होत असल्याने संभ्रम आणि गैरसमज तयार होत आहेत. पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अमित शहा यांना तपास लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत केलेल्या मफलर मॅन च्या आरोपावर भरणे यांनी फडणवीसांची पाठराखण केली.
दूध का दूध पानी का पानी होऊ द्या
कोणासोबत फोटो काढला किंवा कोणी लग्नात मफलर गिफ्ट दिला म्हणजे काहीतरी वेगळा अर्थ होत नाही. अजितदादा आणि फडणवीस यांचे नाते मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण वक्तव्ये न करता तपासातून दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्यावे असे ते म्हणाले.
















