शिकागो : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्यास नक्कीच वाव आहे; मात्र पाकिस्तानचा दहशतवादाला असलेला पाठिंबा हा दोन्ही देशांमधील संवादातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे परखड मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. निष्पाप लोकांची हत्या सुरू असताना पाकिस्तानशी चर्चा करणे अशक्य असल्याचेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. बुधवारी शिकागो विद्यापीठात आयोजित एका संवाद सत्रात राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याचा व्हीडीओ शेअर केला आहे.
प्रसिद्ध अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट पेप यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. यावेळी खुश नावाच्या पाकिस्तानी विद्यार्थ्याने भारत आणि पाकिस्तान आरोप-प्रत्यारोप सोडून परस्पर फायद्यासाठी एकत्र काम करू शकतात का? असा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले, एकत्र काम करण्यास वाव आहे, पण सर्वात मोठी समस्या पाकिस्तानकडून आपल्या देशात दहशतवादाला दिले जाणारे प्रोत्साहन आणि पाठिंबा ही आहे. आपल्या निष्पाप लोकांची हत्या होत असताना पाकिस्तानशी संवाद साधणे आम्हाला स्वीकार्य नाही, असे राहुल गांधी ठामपणे म्हणाले.
निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यास लोकशाही संपेल
निवडणूक व्यवस्थेत काही त्रुटी आहेत म्हणून निवडणुकांवर बहिष्कार घालणे शहाणपणाचे नाही. तसे पाऊल उचलल्यास त्या क्षणाला लोकशाहीचा अंत होईल. काँग्रेस पक्षाचा तसा कोणताही विचार नाही असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी मांडले. तसेच व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे याची लोकांना जाणीव होईपर्यंत आम्ही संघर्ष आणि टीका सहन करण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.
















