31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरउन्हाच्या काहिलीमुळे कलींगड-खरबुजाची मागणी वाढली

उन्हाच्या काहिलीमुळे कलींगड-खरबुजाची मागणी वाढली

सोलापूर : अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हात गारेगारची अनुभूती देणाऱ्या फळांकडे सोलापूरकरांनी आपला मोर्चा वळवला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि सध्या रमजानच्या उपवासामुळे कलिंगड, खरबूज, आंबे, मोसंबी, डाळींब, पपई, काळी आणि हिरवी द्राक्षे या मधूर चव असणाऱ्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बाजारात या फळांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या कलिंगडाचा बाजारभाव १० ते १२ रुपये किलो आहे तर खरबूजला २५ ते ३५ रुपये किलोचा दर मिळत आहे. सध्या किरकोळ बाजारात कलिंगड २० ते ४० रूपये आहे. उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्यासाठी कलिंगड हे सर्वोत्तम फळ मानले जाते. यातून गारवा मिळतोच, शिवाय शरीराला विविध पोषक तत्त्वसुद्धा मिळतात. यात पोटॅशियम, रायबोफ्लेविन, आयर्न, कॅल्शियम, जिंक, फायबर, नियासिक, व्हिटॅमिन ए, सी, बी आणि लायकोपीन तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात.

बाजारपेठेत कलिंगड आणि खरबूज यांची विक्री नगावर न होता ती किलोप्रमाणे होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनदेखील आवक होत आहे. ४० रुपये किलो तर खरबूज ३० ते ५० रुपये किलो बाजारभावाने विक्री होतआहे. जिल्ह्यासह, बीड, धाराशिव, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच अक्कलकोट, बार्शी, अफजलपूर, करमाळा, मंगळवेढा गुलबर्गा आदी ठिकाणाहून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होते.

यामध्ये बेबी आणि नामधारी या प्रजातींच्या कलिंगडांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता, ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कलिंगड, खरबूज आहे अशा शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होत आहे. मात्र,उन्हाचा तडाखा वाढल्याने काही फळे लवकर खराब होण्याचे प्रमाणदेखील अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.कस्तुरी खरबूजमध्ये ‘अ आणि ‘क’ जीवनसत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा सापडतो.

त्यात सुमारे ९० टक्के पाणी आणि नऊ टक्के कर्बोदके आढळतात. खरबुजामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि ‘क’ जीवनसत्वाचा साठा असल्याने पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत होते. त्याचसोबत अल्सर, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या पोटाशी निगडीत समस्या दूर ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील फायबरयुक्त खरबूज फायदेशीर ठरते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR