नागपूर : प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतक-यांची कर्जमाफी करा अशी मागणी करत नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन केले. त्यांनंतर सरकारने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. त्यानंतर कर्जमाफी संदर्भात मुंबईत बैठक घेण्यात आली.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या कर्जमाफी संदर्भात ३० जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे सरकारने आता ३० जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कडू यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश आल्याचे दिसत आहे. मात्र, बच्चू कडू यांचे आंदोलन संपताच सरकारने शेतकरी नेत्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान नागपुरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. बेकायदेशीरपणे महामार्ग रोखला. ज्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केले आहेत. त्यामुळे आंदोलन संपताच पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करायला सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.
तर आंदोलकांनी आंदोलनासाठी परवानगी दिलेल्या जागेऐवजी २ किमी मागेच वर्धा येथे आंदोलन करत महामार्ग अडवल्यामुळे ३० तासांहून अधिक वेळ महामार्गावर कोंडी झाली. यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे शिवाय वाहतुकीत अडथळा निर्माण करणे अशा कलमांखाली हिंगणा पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा
भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी केली आहे. बच्चू कडू यांनी समाजसेवेच्या नावाखाली ७२ एकर परिसरात खंडणीच्या पैशातून हवामहाल बांधल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे.

