नवी दिल्ली : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सापडलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महुआ यांनी सांगितले की, मला अॅपलकडून अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.
गृहमंत्रालयाला टॅग करत महुआ यांनी पुढे लिहिले आहे की अदानी आणि पीएमओचे लोक, जे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुमच्या भीतीमुळे मला तुमची दया येते. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, मला आणि इंडिया आघाडीच्या इतर तीन नेत्यांना आतापर्यंत असे अलर्ट मिळाले आहेत.
नेमके काय प्रकरण आहे?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली होती. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते.
५० प्रश्न अदानींवर होते
जय अनंत देहाद्राई यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत. निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते. त्याचवेळी मोईत्रा यांनी या संपूर्ण वादासाठी निशिकांत दुबे आणि त्यांचा मित्र जय अनंत यांना जबाबदार धरले.