कोच्ची : भारतीय नौदलाने चोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडत, पुन्हा एकदा समुद्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. काल रात्री, एडनच्या आखातात, भारतीय युद्धनौका आयएनएस त्रिखंडने आपली बुद्धिमत्ता आणि चपळाई दाखवत, एका मालवाहू जहाजाला चोरांच्या तावडीतून सुरक्षितपणे वाचवले.
चोरांनी हल्ला केलेले जहाज एमव्ही गोल्डन आर्सेनल आहे. हे व्यापारी जहाज भारतासाठी महत्त्वाचा माल घेऊन जात होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या जहाजाच्या कर्मचा-यांमध्ये एक भारतीय नागरिकही होता. मिळालेल्या माहितीनुसार, जहाजाच्या क्रूने हल्ल्यादरम्यान सावधगिरी बाळगली. चोरट्यांनी जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच, सगळे क्रू सदस्य एका सुरक्षित खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी तात्काळ रेडिओ संप्रेषण माध्यमांद्वारे भारतीय नौदलाला हल्ल्याची माहिती दिली आणि मदतीची विनंती केली. संकटाची माहिती मिळताच, जवळच तैनात असलेले भारतीय युद्धपोत आयएनएस त्रिखंड मदतीसाठी लगेच घटनास्थळी रवाना झाली. जवळ येत असलेले भारतीय युद्धपोत पाहून आणि नौदलाच्या भीतीने चोरटे पळून गेले. चाचे पळून गेल्यानंतर, भारतीय नौदलाचे शूर मार्कोस कमांडो जहाजावर उतरले. त्यांनी संपूर्ण जहाजाची कसून तपासणी केली, जेणेकरून जहाजावर कोणताही धोका किंवा चाचे शिल्लक राहणार नाहीत याची खात्री करता येईल.
















