27.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeनांदेडलोकसभेच्या रणसंग्रामात विकासाचा मुद्दा कोसो दूर

लोकसभेच्या रणसंग्रामात विकासाचा मुद्दा कोसो दूर

दलित, मुस्लिम, मराठा आणि लिंगायत समाजावर लातूर लोकसभेचे गणित!

कंधार : सय्यद हबिब
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी कालावधी जवळ येत आहे तशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. जनतेमध्ये आश्वासनांची पेरणी सुरू आहे. आता लोकसभेचा आखाडा ख-या अर्थाने रंगात आला आहे. सहा विधानसभा क्षेत्रात येणा-या लातूर लोकसभेत जवळपास १९ लाख मतदार आहेत. २०१९ मध्ये एकूण मतदानाची संख्या ८ लाख ९१ हजार ६१८ होती. ज्यात एकूण पुरुष मतदार ६ लाख २५ हजार ६० आणि महिला मतदार ५ लाख ४६ हजार ४०१ होत्या. २०१९ मध्ये एकूण मतदान ६२.३६ टक्के झाले होते.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात मात्र गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. २०१४ मध्ये डॉ. सुनील गायकवाड तर २०१९ मध्ये सुधाकर शृंगारे यांचा भाजपच्या उमेदवारीवर विजय झालेला आहे. तर यंदाच्या निवडणुकीत देखील भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून लिंगायत समाजाचे गुरू असणा-या जंगम जातीचे असलेल्या नवख्या चेह-याला म्हणजे डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लातूर लोकसभेतील जातीय समीकरणे पाहिली असता दलित मतदारांची संख्या ४ लाख १९ हजार, मराठा ३ लाख ४० हजार, मुस्लिम ३ लाख १० हजार, लिंगायत ३ लाख, येलम ओबीसी २ लाख, माळी ६४ हजार, बंजारा-वंजारी ५० हजार, इतर एक लाख मतदार असून दलित, मुस्लिम, मराठा आणि लिंगायत समाजावर लातूर लोकसभेची गणिते ठरलेली असून ज्याच्या पारड्यात या समाजाची मते जाणार तो बाजी मारणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे तप्त उन्हातही लोकसभा क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पेलत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत.

लोहा विधानसभा क्षेत्रातील समस्या कायम….
लातूर लोकसभेतील लोहा विधानसभा क्षेत्रातील समस्या पाहिल्या असता निवडणुका आल्या की विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी असतो, आश्वासनांची खैरात वाटली जाते. मात्र, निवडणुका संपल्या व लोकप्रतिनिधी निवडून आले की, विकास आणि आश्वासन यांचा विसर पडतो.

सुविधांचा अभाव
तालुक्यातील अनेक गावांत मूलभूत सोयी- सुविधांचा अभाव कायम आहे. कंधार तालुका आजही विकासापासून दूरच आहे. या मतदारसंघाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना आजही कृत्रिम पाणीटंचाईची झळ बसत आहे. शुद्ध असलेले पाणी, पक्के रस्ते, शैक्षणिक सुविधा वाहतुकीच्या साधनांचा अभाव प्रामुख्याने जाणवतो. मूलभूत सुविधांपासून वंचित तालुक्यातील नागरिक दररोज समस्यांना तोंड देत दैनंदिन व्यवहार करीत आहेत. अनेक गावांत आजही एसटी बस पोहोचलेली नाही.

औद्योगिक विकासावर नजर टाकली तर फुलवळ येथील औद्योगिक विकास महामंडळ नावापुरतेच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तालुका पोरका आहे. येथे भुईकोट किल्ला, जगतुंग (तलाव) समुद्र, मानार नदीकाठावरील शांती घाट, तसेच क्षेत्रपाल मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, कृष्णेश्वर मंदिर, कालप्रिय मंदिर, बंकेश्वर मंदिर, जैन मंदिर, बौद्ध विहार, बडी दर्गाह, छोटी दर्गाह, यांसह अनेक धार्मिक स्थळं आहेत. कंधार तालुक्यात मुबलक जलसाठा असला तरी शेतीला सिंचनाचा प्रश्न आजही भेडसावत आहे. शेतक-यांचाही विकास येथे अडलेलाच दिसत आहे. विकास नावापुरताच. एकही मोठा उद्योग नाही. तालुक्यात एकही मोठा उद्योग, कारखाना नाही. यामुळे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात युवक शहरात जात आहेत. तालुक्यातील सर्व समस्या वर्षानुवर्षांपासून कायम आहेत. लोकप्रतिनिधी निवडून प्रतिनिधित्व करून पुन्हा निवडणुकांना सामोरे जातात. परंतु तालुक्यातील समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विकासाच्या गोष्टी करण्यात येत असूनही तालुका विकासापासून कोसो दूर आहे, हे कटू सत्य आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR