36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत पार पडणार असून त्यातील दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. तर आता ७ मे रोजी तिस-या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तिस-या टप्प्यात महाराष्ट्रातील बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. तर आज (५ मे) तिस-या टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आज सायंकाळी पाच वाजता या प्रचार तोफा थंडावणार आहेत.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात महिन्यापासून चुरशीने सुरू असलेल्या प्रचाराचा आज शेवट होणार आहे. आज रविवार असल्याने जिल्ह्यात प्रचाराचा ‘सुपर संडे’ पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात तर धैर्यशील माने यांच्यासाठी इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात घरोघरी जात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे.

यामध्ये आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महायुतीकडून धैर्यशील माने, मविआकडून सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह वंचित बहुजनचे डी. सी. पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्ह्यात लागू होणार बंदी आदेश
आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात येणार आहे. तसेच कलम १४४ लागू झाल्यानंतर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात येणार आहे. हा आदेश मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस जिल्ह्यात ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR