गोव्यात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून तो अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील जनता ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार, याची तारीख खाजगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने (Skymet) स्पष्ट केली आहे.
मुंबई-पुण्यात या तारखेला बरसणार मान्सून
स्कायमेट आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून अंदमानात वेळेआधी दाखल झाल्यामुळे त्याची पुढील वाटचाल अतिशय वेगाने सुरू आहे. येत्या ७ ते १० जूनच्या दरम्यान मान्सून गोव्यात आपले बस्तान मांडेल. त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा प्रवेश होईल. मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात १० ते १३ जून दरम्यान मान्सूनचे अधिकृत आगमन होण्याची दाट शक्यता आहे. तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये ११ ते १४ जून दरम्यान मान्सूनच्या पहिल्या सरी बरसतील, असा स्कायमेटचा अंदाज आहे.
सुरुवातीला दमदार, पण नंतर चिंतेचे सावट
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जून महिन्यात मान्सूनची सुरुवात चांगली आणि समाधानकारक राहील. जूनमध्ये मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरण्या वेळेत सुरू करता येतील.
परंतु, यंदाच्या मान्सूनच्या उत्तरार्धावर ‘एल निनो’चे (El Niño) सावट राहण्याची शक्यता आहे. यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते आणि पावसाचे वितरण असमान होण्याची चिंता आहे. त्यामुळे सुरुवातीला जरी पाऊस वेळेवर येत असला, तरी शेतकऱ्यांनी पेरणी करताना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
















