वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून नेहमी इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणा-या अमेरिकेने आता इस्रायललाच एक मोठा दणका दिला आहे. इस्रायलचे कट्टर उजवे विचारसरणीचे नेते आणि संरक्षणमंत्री बेन ग्वीर यांना अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिला आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेन ग्वीर अमेरिकेतील मियामी येथे जाणार होते, परंतु अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा मंजुरी न मिळाल्याने अखेर त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे. इस्रायलच्या इतिहासात एखाद्या विद्यमान मंर्त्याला अमेरिकेने व्हिसा नाकारण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जागतिक पातळीवर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
संरक्षणमंत्री बेन ग्वीर यांनी सोमवारी तेल अवीव येथील अमेरिकन दूतावासाशी व्हिसासाठी संपर्क साधला होता. मात्र, अमेरिकन अधिका-यांनी त्यांना विशेष सवलत देण्याऐवजी सामान्य नागरिकाप्रमाणे वैयक्तिकरित्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. अमेरिकन दूतावासाने बेन ग्वीर यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की तुमच्यावर अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वत: कार्यालयात येऊन तुमचा बायोमेट्रिक डेटा द्यावा लागेल. मात्र, देशाचे संरक्षणमंत्री असताना स्वत: दूतावासात हजर राहण्यास आणि बायोमेट्रिक डेटा देण्यास बेन ग्वीर यांनी साफ नकार दिला. या नकाराने संतापलेल्या अमेरिकन दूतावासाने त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला, ज्यामुळे अखेर हा दौरा रद्द करण्याची नामुष्की इस्रायली मंत्र्यांवर आली.
इस्रायली मीडिया चक्रावला
जेरुसलेम पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने इस्रायलच्या कोणत्याही मंर्त्यासोबत असा कडक व्यवहार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामान्यत: इस्रायली मंत्र्यांना अमेरिका व्हीआयपी किंवा स्पेशल व्हिसा जारी करते, जेणेकरून त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण येत नाही. अमेरिकेचे हे वागणे अत्यंत असामान्य असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
इराण डीलवरून अमेरिकेला दाखवले होते डोळे
अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता करारावर इस्रायलमधून सर्वात पहिली आणि तिखट प्रतिक्रिया बेन ग्वीर यांनीच दिली होती. “इस्रायल हा अमेरिकेच्या कोणत्याही कराराला मानण्यास बांधील नाही असे म्हणत त्यांनी थेट अमेरिकेलाच आव्हान दिले होते. इतकेच नाही तर आम्ही लेबनानमधून आपले सैनिक मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. याच भूमिकेमुळे अमेरिका त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
















