17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयराजस्थानमध्ये सत्ताविरोधी वातावरण नाही : दोतासरा

राजस्थानमध्ये सत्ताविरोधी वातावरण नाही : दोतासरा

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यानंतर आता प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनीही मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर पक्षाचे हायकमांड आमदारांचे मत घेऊन घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ते म्हणाले की, राजस्थानमध्ये सत्ताविरोधी वातावरण नाही. आमच्या पक्षाची आधीच स्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आम्ही कधीच अगोदर जाहीर करत नाही. पक्ष हायकमांड विजयी होणार्‍या आमदाराचे मत घेऊन सर्वांना मान्य असेल तो निर्णय घेईल. तो निर्णय आम्ही मान्य करू, यापूर्वीही स्वीकारला आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात लोकांमध्ये कोणतीही नाराजी नाही आणि कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा अपयशी ठरेल, असा दावाही दोतासरांनी केला. गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे मानले जाणारे दोतासरा म्हणाले की, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांमध्ये कधीही मतभेद झाले नाहीत आणि सर्वजण एकजुटीने निवडणुक लढत आहेत.

दोतासरा म्हणाले की, आमच्यात कधीच मतभेद झाले नाहीत. सर्वजण एकदिलाने निवडणूक लढवत असून ही निवडणूक आम्ही जिंकू. राजस्थानच्या काँग्रेस सरकारने खूप चांगले काम केले आहे आणि त्याविरोधात कोणतेही वातावरण नाही, नाराजी नाही. पहिल्या महागाई निवारण शिबिरात दिलेले १० हमीभाव प्रभावी आहेत. त्यानंतर आणखी सात हमी लोकांसाठी देण्यात आल्या आहेत. माजी मंत्री दोतासारा हे सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, येथून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR