धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणक, इलेक्ट्रीक मोटारसह खिचडी बनविण्याचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. चोरीची ही घटना दि. १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाळेच्या शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाणे येथे दि. १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडदोरा ता. उमरगा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी शाळेतील खोलीत ठेवलेले एसर कंपनीचा संगणक, दोन बेस्टस्टॉन कंपनीचा टॅब, स्पिकर साउंड, ५ एचपी ची ईलेक्ट्रीक मोटर, पाणी फिल्टर आरओ, दोन वजन काटे, ५० किलो तांदुळ, १० किलो मसुर व १० कि. मुगदाळ, किर्र्ती गोल्ड तेल १० पाकीट असा एकूण ४२ हजार ५०० रूपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनी दि.१७ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पोलीस ठाणे येथे कलम ४६१, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.