मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा बंडखोरीचे ढग जमा झाले आहेत. पक्षाच्या सहा खासदारांनी बंडाचा पवित्रा घेतला असून ते संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे जाऊन हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या संभाव्य बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ओमराजे यांनी अद्याप आपला अंतिम निर्णय जाहीर केलेला नसून, ते आज किंवा उद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आणि युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
या सर्व परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आम्ही स्वत: दौरा करणार आहोत. पुन्हा एकदा डरपोक लोक पैसे खाऊन पळाले आहेत. आम्ही थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहोत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, आमदार वरुण सरदेसाई आणि किशोर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, संसदीय पक्षाच्या बैठकीला जे खासदार उपस्थित होते, ते सर्वांनी पाहिले आहेत. जे बैठकीला आले नाहीत, पण ज्यांना पुन्हा पक्षात परतण्याची इच्छा असेल, तर त्यांनी नक्की यावे. कारण उद्धव ठाकरेंचे मन खूप मोठे आहे. परंतु, जे जाणीवपूर्वक पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांच्यावर कडक कारवाई निश्चित होईल.
‘तळ्यात-मळ्यात’ असणा-यांनी बुडायचे की नाही हे ठरवावे
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांची भूमिका सध्या ‘तळ्यात-मळ्यात’ असली, तरी आता राजकीयदृष्ट्या बुडायचं की नाही, हे त्यांनी स्वत:च ठरवावे असा थेट सल्ला आणि इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
















