मुंबई/ नागपूर : मुंबईतील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर आणि मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यात केवळ उच्च न्यायालयच नव्हे, तर मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, असा मजकूर होता. यात प्रामुख्याने वांद्रे आणि किल्ला कोर्टाचाही उल्लेख असल्याचे समजते. ही माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास तातडीने उच्च न्यायालयाची इमारत रिकामी केली. तसेच वांद्रे न्यायालयातही कामकाज स्थगित करून वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
अंधेरी न्यायालयात बॉम्ब असल्याची निनावी धमकी मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. सध्या न्यायालयाच्या परिसरांना वेढा घालण्यात आला असून, आतून कोणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरून कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
नागपूरच्या कोर्टात आरडीएक्स पेरले
मुंबईप्रमाणेच नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयालाही सकाळी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले की, “सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या न्यायालयाच्या इमारतीत दोन आरडीएक्स आधारित स्फोटके पेरली असून लवकरच त्यांचा स्फोट होईल असा दावा या मेलमध्ये करण्यात आला होता. यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवून तपासणी मोहीम हाती घेतली. सुदैवाने अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
ई-मेलचा तपास सुरू
सदरील धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला? त्याचा उद्देश काय? याचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि नागपूर सायबर पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. धमकीच्या मेलचे आयपी अॅड्रेस ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी आणि वकिलांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुरक्षा व्यवस्था वाढविली
एका अज्ञात आरोपीने गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ई-मेल पाठवून न्यायालय परिसरामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून परिसराची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे : पोलिस
परिसरात कुठेही संशयित वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस चौकीला माहिती द्यावी. तसेच अशा वस्तूला कोणीही हात लावू नये. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस कर्मचा-यांना वस्तूंची तपासणी व इतर तपासण्यांकरिता सहकार्य करावे, असे आवाहन न्यायालय प्रशासन व वकील संघटनेने केले आहे.

