पाथरी : शेतातील सोयाबीनचा ढीग जाळल्याचा संशय आणि शेतरस्त्याच्या कारणावरून भावकीत पेटलेल्या वादाने दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री रक्तरंजित वळण घेतले. यातून घडलेल्या थरारात पाथरी तालुक्यातील खेर्डा येथे कोयता, लोखंडी पाईप आणि गजाने झालेल्या प्राणघातक हल्ल्यात उर्मिला लक्ष्मण सिताफळे (वय ४२) या महिलेचा मृत्यू झाला असून पती लक्ष्मण सिताफळे हे गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सर्वांना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डा येथील सिताफळे कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून शेतातील रस्ता आणि सोयाबीनच्या ढिगा-यावरून तणाव सुरू होता. सोमवारी रात्री ७.५० वाजेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. यात तुकाराम कुंडलिक सिताफळे, वैजनाथ कुंडलिक सिताफळे आणि लक्ष्मीबाई कुंडलिक सिताफळे यांनी संगनमत करून लक्ष्मण सिताफळे व उर्मिला सिताफळे यांच्यावर तुटून पडले.
आरोपी तुकाराम याने धारदार कोयत्याने, वैजनाथ याने लोखंडी पाईपने तर लक्ष्मीबाईने गजाने डोके, मान आणि गळ्यावर लागोपाठ जीवघेणे वार केले. या हल्ल्यात लक्ष्मण व उर्मीला दोन्ही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले. ही घटना घडल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गंभीर जखमींना तात्काळ पाथरी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान उर्मिला सिताफळे यांची प्राणज्योत मालवली. पती लक्ष्मण सिताफळे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून तुकाराम सिताफळे, वैजनाथ सिताफळे आणि लक्ष्मीबाई सिताफळे या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मयत उर्मिला यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेत वापरलेला कोयता जप्त केला आहे. पुढील तपास पाथरी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
















