परभणी : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषि व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संधी ओळखून यशस्वी उद्योजक बनावे. उद्योजकता हा केवळ व्यवसायाचा प्रकार नसून ती एक वृत्ती आणि कार्यशैली आहे. प्रत्येकाने ही वृत्ती विकसित करत आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जागतिक अन्न दिनानिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक तथा अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा यशस्वी उद्योजक कळंब येथील मराठवाडा कृषि प्रक्रिया शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब गिते, मुंबई येथील प्रीमिया फूड प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष गंभीरे यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब गीते, श्याम गंभीरे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. उद्योजक होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, जिद्द, धैर्य आणि संयम आवश्यक आहे. विशेषत: अन्न उत्पादन आणि अन्नातील भेसळ रोखण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात ५०० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी श्रुती स्वामी, अश्विन सुरगोंड यांनी तर आभार प्रदर्शन श्रुती नखाते यांनी केले.

