29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत तीन जागांचा तिढा कायम

महायुतीत तीन जागांचा तिढा कायम

नाशिक, ठाणे अनिर्णीत साता-याचा निर्णय लटकला

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी महायुतीत ही जागा भाजपकडे राहणार की अजित पवार गटाकडे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

नाशिक व ठाण्याच्या जागेचा निर्णय होत नसल्याने साता-याचा निर्णय लटकला आहे. महायुतीत अजित पवार गटाकडे असलेला सातारा भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी मागितला आहे. त्या बदल्यात शिंदे गटाकडे असलेला नाशिक मतदारसंघ छगन भुजबळ यांच्यासाठी अजित पवार गटाला दिला जाणार, असे चित्र आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा असलेला ठाणे मतदारसंघ भाजपला हवा आहे. दोन्ही जागांवरील दावा शिंदेसेनेने सोडलेला नाही. नाशिक मिळत नाही, तोपर्यंत सातारा उदयनराजेंसाठी सोडायला अजित पवार गट तयार नाही.

काँग्रेसकडूनही सातारसाठी प्रयत्न
महाविकास आघाडीत सातारची जागा शरद पवार गटाकडे आहे. इथून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची विनंती शरद पवार गटाने केली होती. मात्र, चव्हाण ‘तुतारी’ऐवजी ‘पंजा’ वर निवडणूक लढविण्यास तयार आहेत.

राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
आगामी लोकसभा निवडणुका आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा असे समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. लोकसभा लढविणार की थेट विधानसभा, महायुतीला पाठिंबा देणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मेळाव्यातून मिळणार आहेत.

उदयनराजे प्रतीक्षेतच
उदयनराजेंना भाजपकडून आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा कधी होते, त्याची प्रतीक्षा आहे. उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. दिल्लीतून साता-यात परत आल्यानंतर भाजपकडून उमेदवारी मिळाली, म्हणून त्यांचे साता-यात जोरदार स्वागतही झाले होते. त्यानंतर, त्यांनी कमळावर प्रचारही सुरू केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR