मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या हॉरर-कॉमेडी या प्रकाराला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, नुकताच प्रदर्शित झालेला ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट त्याचे ताजे उदाहरण ठरत आहे. ५ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हॉरर आणि विनोदाचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५४ लाख रुपयांची कमाई करत सकारात्मक सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी झेप घेत चित्रपटाने तब्बल ९८ लाख रुपयांचा गल्ला जमवला. यामुळे चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत दीड कोटी रुपयांच्या जवळपास मजल मारली.
वीकेंडचा फायदा चित्रपटाला मोठ्या प्रमाणात झाला. रविवारी प्रेक्षकांची गर्दी वाढल्याने तिसऱ्या दिवशी ‘तुंबाडची मंजुळा’ने तब्बल १.७३ कोटी रुपयांची कमाई केली. परिणामी, पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३.७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने २.७१ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदवला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील मोठ्या बजेटच्या आणि चर्चेत असलेल्या ‘राजा शिवाजी’ तसेच ‘देऊळ बंद २’ या चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘तुंबाडची मंजुळा’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी कालावधीत मिळालेल्या या यशामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटातील रहस्यमय वातावरण, विनोदी प्रसंगांची मांडणी, प्रभावी अभिनय आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षक चित्रपटगृहांकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः तरुण प्रेक्षक आणि कुटुंबीय वर्गाकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्रपट व्यावसायिकांचे मत आहे.
चित्रपटाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती प्रेक्षकसंख्या पाहता येत्या काही दिवसांतही ‘तुंबाडची मंजुळा’ची कमाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉक्स ऑफिसवरील ही घोडदौड कायम राहिल्यास हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी हॉरर-कॉमेडींपैकी एक ठरू शकतो, असा विश्वास चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
















