13.6 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयतामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई : तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली असून उद्या म्हणजेच २९ सप्टेंबरला चेन्नई येथील राजभवनात उदयनिधी स्टॅलिन यांचा शपथविधी होणार आहे. उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.

मंगळवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते असे संकेत दिले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळात देखील बदल होऊ शकतात असे म्हटले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यासह व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी, आर. राजेंद्रन आणि थिरू एसएम नासर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. नवीन मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी ३.३०वाजता चेन्नई येथील राजभवनात होणार आहे.

दरम्यान, तामिळनाडू सरकारने नुकतेच सुप्रीम कोर्टातून जामिनावर सुटलेल्या सेंथिल बालाजी यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दूध आणि दुग्धविकास मंत्री टी. मनो थंगाराज, अल्पसंख्याक कल्याण आणि अनिवासी तमिळ कल्याण मंत्री के. एस. मस्तान आणि पर्यटन मंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफारसही केली. मुख्यमंत्र्यांच्या या शिफारसीला राज्यपालांनीही मान्यता दिली आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगम डीएमकेच्या विजयाचे श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उदयनिधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच, या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवता आला. त्यामुळे आता उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवायचा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR