34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही

उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही

संजय राऊत यांचे विधान

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत. तर इंडिया आघाडीकडून अद्यापही पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण, यावर एकमत होऊ शकलेले नाहीत. मध्यंतरी इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानपदासाठी अनेक नेते इच्छुक आहेत, त्यात उद्धव ठाकरेही आहेत, असे विधान केले.

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील राजकारणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, हा उद्धव ठाकरेंनी केलेला दावा शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून, दिल्लीत जाऊन अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न होते. स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच पाठिशी उभे राहतो. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी आणि शाहांना आवडले नसावे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले. त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. यावेळी पंतप्रधानपदाबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

पंतप्रधानपदासाठी वाद नाहीत. आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसवाल्यांना समजत नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते जर पंतप्रधानपदासाठी इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागत आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी देशातील अन्य अनेक नेते इच्छुकांच्या रांगेत आहेत. ममता बॅनर्जी आहेत, अखिलेश यादव आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत. यांच्यासह अनेक चेहरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. कोणाचे नाव घेणे गुन्हा आहे का, आमच्या पक्षनेत्याचे आम्ही नाव घेत असू तर त्यात चुकीचे काय आहे यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी ३०० हून अधिक जागा मिळवेल. त्यानंतर इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाईल. उद्धव ठाकरेंच्या चेह-याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याला सकारात्मक उत्तर दिले. इंडिया आघाडीत आणखीही नेते आहेत. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. देशभरात राज्य पातळीवरही अनेक नेते आहेत. नेतृत्व कुणाचे असेल हा प्रश्न आमच्यासमोर नाही. आमची लढाई हुकूमशाहीविरोधात आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR