ढेबेवाडी : निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखली जाणारी १० दुर्मिळ गिधाडे सह्याद्रीच्या कुशीत लवकरच दाखल होणार आहेत. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधतेत आता एका महत्त्वाच्या घटकाची भर पडणार आहे. हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रात जन्मलेली ही गिधाडे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत.
वन विभागाच्या सहकार्याने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) राज्यात गिधाड संवर्धन प्रकल्प राबवत आहे. या उपक्रमांतर्गत हरियाणातून ३५ गिधाडे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यामध्ये लांब चोच आणि पांढ-या पाठीची अशा दोन महत्त्वाच्या प्रजातींचा
समावेश आहे.
मेळघाट, ताडोबा-अंधारीतही सोडणार
या ३५ गिधाडांपैकी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १०, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १५, तर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात १० गिधाडे सोडली जाणार आहेत. यापूर्वी राज्यात आणलेली ३४ गिधाडे ही विदर्भातील मेळघाट, ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली होती. आता प्रथमच सह्याद्रीच्या रांगांमध्ये या प्रकल्पांतर्गत गिधाडांचे पुनर्वसन होत आहे.
विशेष पिंज-यात ठेवून टॅग लावणार
सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी या गिधाडांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस विशेष पिंज-यात ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्या पायांना आधुनिक उपग्रह टॅग लावून निसर्गात मुक्त केले जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे सह्याद्रीच्या डोंगरद-यांतील त्यांच्या हालचाली, नवीन अधिवास आणि जगण्याच्या स्थितीचा सखोल अभ्यास करणे संशोधकांना शक्य होणार आहे.
विविध राज्यांत ७०० हून अधिक गिधाडांचे यशस्वी प्रजनन
निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणा-या गिधाडांची घटती संख्या ही चिंतेची बाब ठरली होती. यावर मात करण्यासाठी बीएनएचएसने २००४ पासून देशातील विविध राज्यांच्या सहकार्याने आतापर्यंत ७०० हून अधिक गिधाडांचे यशस्वी प्रजनन केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणारे हे पुनर्वसन पश्चिम घाटातील नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
















