तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा उघड धमकी दिली आहे. इराणने अमेरिकेच्या भूमीवर डर्टी बॉम्ब टाकण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास इराणचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनमधील शेनझेन येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेसाठी गेले असताना बुधवारी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वॉशिंग्टन डीसीमधील नागरिकांनी इराणकडून डर्टी बॉम्ब हल्ल्याची चिंता करावी का, असे विचारले असता ट्रम्प यांनी मला तसे वाटत नाही. मात्र, असा हल्ला झालाच तर आम्ही इराणला पूर्णपणे नष्ट करू असा इशारा दिला.
इराण अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी जैविक शस्त्रांचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचे ठोस संकेत मिळाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. इराणकडून विषारी वायू आणि जैविक शस्त्रांचा अभ्यास सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. अण्वस्त्रांचा वापर करणे तुलनेने अधिक कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले. इराणचे लोक अत्यंत क्रूर आहेत. हे युद्ध आम्ही सुरू केलेले नाही, तर गेल्या ५१ वर्षांपासून ते सुरू आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी मंगळवारीही ट्रम्प यांनी इराणकडून मिळालेल्या कथित डर्टी बॉम्बच्या धमकीला आपण अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे म्हटले होते. इराणचे सत्ताधारी वेडे आहेत असा उल्लेख करत त्यांनी, या देशाला आजवर कोणत्याही देशाला मोजावी लागली नसेल अशी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला होता.
चीन किंवा रशियाच्या मदतीची गरज नाही
इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी चीन किंवा रशियाच्या मदतीची अमेरिकेला कोणतीही गरज नाही असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. आम्ही इराणचे नौदल, हवाई दल आणि हवाई संरक्षण यंत्रणा पराभूत केली आहे. इराणकडे असलेल्या क्षेपणास्त्रांची क्षमता पूर्वीच्या तुलनेत केवळ १२ ते १३ टक्क्यांवर आली आहे. इराणला आता करार करायचा आहे. त्यामुळे मी कोणाकडेही मदत मागण्यासाठी जाणार नाही.
होर्मुझवर पूर्ण नियंत्रण
होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचाही दावा त्यांनी केला. तसेच इराणला करार करायचा आहे; मात्र मला असा करार हवा आहे, जो दीर्घकाळ टिकेल. हे युद्ध मी लवकरच संपवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हे युद्ध संपवले जाईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
















