32.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण?

पुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण?

पुणे, प्रतिनिधी
पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जाहीर झाला मात्र अजूनही काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नाही. पुण्याची जागा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे. दरम्यान मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निवडणुकीत उत्कंठा निर्माण करणारी ठरणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्याप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराची घोषणा अद्याप झाली नाही. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली असल्याचे दिसते. मात्र राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा (अजित पवार गट) उमेदवार जाहीर झाला नाही पण या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे दिसते आहे. यातच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्यंतरीच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवतारे यांनीही भेट घेतली आहे त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली पण महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या तरी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नजीकच्या काळात त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे काही इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर आबा बागुल, माजी मंत्री रमेश बागवे, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचा समावेश आहे. उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR