भारतीय संघ सलग ८ सामने जिंकून गुणतालिकेत क्रमांक एकवर आहे. रविवारी भारत बंगळुरूमध्ये नेदरलँडला धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे भारताने श्रीलंकेला हरवून उपान्त्य फेरीत आधीच प्रवेश निश्चित केला आहे. भारताबरोबर उपान्त्य सामन्यात कोण खेळू शकतं? पाकिस्तान संघ पुन्हा भारताशी दोन हात करू शकतो का? हे समीकरण आता समोर आलं आहे.
बुधवारी इंग्लंडने नेदरलँडचा पुणे मुक्कामी १६० धावांनी पराभव केला. तसे तर दोन्ही संघ स्पर्धेतून एलिमेंट झाले आहेत. फक्त इंग्लंडचा या विजयामुळे पुढील वर्षी होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रवेश निश्चित झाला. या सामन्याच्या निकालाचा बाद फेरीत प्रवेशासाठी काहीच परिणाम होणार नव्हता. वानखेडेवर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर अविश्वसनीय विजय मिळविल्यानंतर विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार हे निश्चित झाले .
मात्र न्यूझिलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ अजूनही भारताविरुद्ध उपान्त्य फेरीचा सामना खेळण्याच्या शर्यतीत आहेत. न्यूझिलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी आठ गुण आहेत, परंतु त्यांच्या क्रमवारीतील फरक निवळ धावगतीमध्ये (नेट रनरेट) आहे. न्यूझिलंडची धावगती सर्वाधिक म्हणजे (+ ०.३९८) आहे. न्यूझिलंड संघाचा शेवटचा सामना बंगळुरूमध्ये श्रीलंकेशी होईल. चांगल्या फरकाने जिंकण्यासोबतच, पाकिस्तान (अधिक ०.०३६) आणि अफगाणिस्तान (-०.०३८) पराभूत व्हावे, अशी प्रार्थना न्यूझिलंडच्या चाहत्यांना करावी लागेल.
न्यूझिलंडने सलग चार सामने गमावले असून श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरूमधील सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता आहे. दुसरीकडे ईडन गार्डन्सवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनल होण्याची अजूनही शक्यता आहे. यासाठी पाकिस्तानला कोलकात्यात ईडन गार्डनवर शनिवारी इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवावा लागेल. बाबर आझमचा संघ पुन्हा लयीत आलेला आहे. त्यांना इंग्लंडविरुद्ध मोठ्या विजयाची गरज आहे.
त्याशिवाय त्यांना न्यूझिलंड आणि अफगाणिस्तानच्या सामन्यांनंतर खेळायचे आहे, त्यामुळे त्यांना सर्व समीकरणे लक्षात घेऊन खेळता येईल. शुक्रवारी अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी अहमदाबाद येथे होणार आहे. याचाच अर्थ पाकिस्तानी संघ शनिवारी ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध खेळला तर त्याचा नेट रनरेट कळेल.
उपान्त्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, कारण नेट रनरेटमध्ये ते शेवटच्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी, न्यूझिलंड आणि पाकिस्तान संघ पराभूत झाले तर अफगाणिस्तानची मोहीम फक्त विजयानेच फत्ते होईल.
नेदरलँड संघाचे चार गुण आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते देखील बाहेर गेलेत, रविवारी होणारा भारताविरुद्धचा सामना जिंकणे अवघडच आहे. कारण उर्वरित सामन्यांमध्ये न्यूझिलंडने श्रीलंकेवर विजय मिळवला तर त्यांचा चौथा क्रमांक निश्चित होत आहे आणि भारताचा उपान्त्य सामना न्यूझिलंडबरोबर मुंबईत होईल पण पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवावाच लागेल. जर न्यूझिलंडने श्रीलंकेला पराभूत केले तर पुढील सर्व सामने औपचारिकच राहतील.
मैदानाबाहेरून
-डॉ. राजेंद्र भस्मे कोल्हापूर,
मोबा. ९४२२४ १९४२८