टोकियो : जपानमधील आयची-नागोया येथे होणा-या २०२६ आशियाई खेळांमधील क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आणि ड्रॉ जाहीर करण्यात आले आहे. आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी ग्वांगझू २०१०, इंचिओन २०१४ आणि हांगझू २०२३ मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. भारत पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत फक्त एकदाच एकमेकांविरुद्ध खेळू शकतील.
पुरुष आणि महिला दोन्ही गटांतील सामने टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जातील आणि सर्व सामन्यांना अधिकृत आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. महिलांची स्पर्धा १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, तर पुरुषांची स्पर्धा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित केली जाईल. पुरुषांच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे, ज्यामुळे ते थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. उपांत्यपूर्व फेरीतील उर्वरित चार जागांसाठी सहा संघांमध्ये प्राथमिक फेरी खेळवली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. मानांकनामुळे भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत. त्यामुळे चाहत्यांना भारत-पाकिस्तानचा रोमांचक सामना केवळ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीतच पाहता येईल. हे सामने १ आणि ३ ऑक्टोबरला होणार आहेत. भारताच्या संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश आहे. त्यामुळे यंदा वैभव सूर्यवंशी पाकिस्तानला चोपून काढताना भारतीय चाहत्यांना पाहता येऊ शकेल.
















