नागपूर : आयसीसी विश्व चषकाच्या फायनल मॅचवर बुकीबाजारात तब्बल ६५ ते ७० हजार कोटींचा सट्टा लागला होता, अशी धक्कादायक माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. क्रिकेट सट्टेबाजीच्या इतिहासात एका सामन्यावर एवढ्या प्रचंड रकमेचा सट्टा पहिल्यांदाच लागला होता. बुकीबाजारातील हा एक नवाच विक्रम असल्याचेही बुकी बाजारातील सूत्रांनी सांगितले आहे.
गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये देश-विदेशातील १ लाख, ३२ हजार क्रिकेट रसिकांच्या साक्षीने रविवारी १९ नोव्हेंबरला विश्वचषकाची फायनल मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये भारतीय संघ कांगारूची शिकार करणार की कांगारू शिकारी ठरणार, असा उत्कंठावर्धक प्रश्न क्रिकेट विश्वाला पडला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय बुकी बाजाराने विश्वविजेता म्हणून भारतीय संघाकडेच बोट दाखविले होते. पहिली इंनिंग सुरू असताना भारतीय संघाला एक रुपयाच्या बदल्यात ४६ पैसे तर ऑस्ट्रेलियाला ४८ पैसे भाव होता.
अर्थात भारत जिंकणार म्हणून बुकीकडे कुणी एक हजार रुपये लावत असेल तर भारतीय संघ जिंकल्यास त्याला केवळ ४६० रुपये मिळणार, याऊलट ऑस्ट्रेलिया जिंकण्याचा दावा करणाऱ्यांना ४८० रुपये लावले तर १ हजार रुपये मिळणार. मात्र, जस-जसा सामन्यातील रोमांच वाढला तसतसे भाव कमी जास्त होत गेले. दुबई आणि बँकाँकमधून संचलित होणाऱ्या बुकीबाजारात मध्य भारतातील नागपूर, इंदोर, भोपाळ, जबलपूर, रायपूर आणि या सेंटरशी कनेक्ट असलेल गोवा, मुंबई हे सर्व सेंटर मॅच अखेरपर्यंत चांगलेच तापून होते, असेही सुत्रांनी सांगितले.