जालना : आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून चर्चेत आलेल्या जालन्यात आता धनगर आरक्षणासाठी भव्य मोर्चा निघणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने उद्या (२१ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जालना जिल्हा सध्या आरक्षणाच्या मागण्यांच्या केंद्रबिंदू बनला असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्याने याची राज्यभरात चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर, गेल्या आठवड्यात झालेली ओबीसी सभा देखील जालन्यातील अंबडमध्ये झाली. असे असतांना आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी देखील जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या भव्य असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्यात, जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा गांधी चमन येथून सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत, अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे, मोर्चाचे रूपांतर सभेत होणार असल्याचे बो-हाडे यांनी सांगितले.
पोलिसांवर सतत बंदोबस्ताचा ताण
आंतरवाली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर हे ठिकाणी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनले आहे. मुख्यमंत्री यांच्यापासून तर मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे दौरे, राजकीय नेत्यांचे दौरे आणि राज्यभरातील मराठा बांधव यांची होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून सतत खडा पहारा दिला जात आहे. त्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारे आंदोलन आणि उपोषण यांना लागणार पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. त्यानंतर ओबीसी सभेसाठी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात, आता धनगर आरक्षणासाठी मोर्चा निघणार आहे. त्यामुळे जालना पोलिसांवर सतत बंदोबस्ताचा ताण पाहायला मिळत आहे.