ग्लासगो : ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने अखेर पदकांचे खाते उघडले. बिहारचा पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमार याने पुरुष हेविवेट गटात कांस्यपदकाची कमाई केली. १९० किलो वजनाची यशस्वी उचल करत त्याने १३०.९ गुण मिळवले आणि भारताला स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.
२८ वर्षीय झंडू कुमारने ब गटामधून खेळताना पहिल्याच प्रयत्नात १८१ किलो, तर दुसरा प्रयत्नात १९० किलो वजन उचलले. त्यामुळे त्याला १३०.९ गुण मिळाले. तिस-या प्रयत्नात त्याने १९६ किलो वजन उचलून बर्किंगहम २०२२ मधील स्पर्धा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. तरीही त्याची दुसरी सर्वोत्तम उचल कांस्यपदकासाठी पुरेशी ठरली. नायजेरियाच्या रिलुवान इद्रिसने सुवर्ण, तर इंग्लंडच्या मॅथ्यू होर्डिंगने रौप्यपदक पटकावले.
संघर्षातून घडलेला झंडूचा सुवर्णप्रवास
बिहारमधील नालंदा जिह्यातील हरनौत येथील झंडू कुमार बालपणापासून पोलिओग्रस्त आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने वडिलांसोबत रस्त्यावर भाजीपाला विकला. कोविड काळात ई-रिक्षा चालवून घर चालवले. आज त्याच खेळाडूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकत संघर्षाचे सोने केले आहे.
ई-रिक्षा विकून खेळला राष्ट्रीय स्पर्धा
२०२३ मधील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी झंडूने स्वत:ची ई-रिक्षाच विकली होती. त्या स्पर्धेत त्याला एकही यशस्वी उचल करता आली नव्हती. मात्र, त्याची गुणवत्ता पॅरालिम्पिक कांस्यपदकविजेते राजिंदर सिंह राहेलू यांच्या नजरेत भरली. त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात त्याला संधी मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले.
















