लातूर : प्रतिनिधी
अनेकदा संगीत हा मनोरंजनाचा विषय मानला जातो. पण तसे नाही. कारण शास्त्रीय संगीतातून अंतर्दृष्टी प्राप्त होते. अंतर्दृष्टी वाढविण्यासाठी संगीत वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर त्याचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी येथे केले.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्तेश्री ज्ञान सरस्वती मंदिर संस्थेचा ‘स्वरतालयोगी पं. गोविंदराव बोरगावकर स्मृती पुरस्कार’ पं. अजय चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार विक्रम काळे, उद्योजक तुकाराम पाटील, आयोजक डॉ. राम बोरगावकर, पं. बाबूराव बोरगावकर आदी उपस्थित होते. पगडी, शाल, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पं. अजय चक्रवर्ती यांनी ही पुरस्काराची रक्कम ज्ञान सरस्वती मंदिर संस्थेला लगेचच परत केली.
पं. अजय चक्रवर्ती म्हणाले की, मी लातूरमध्ये जवळपास ३५ वर्षांनंतर आलो आहे. इथे झालेल्या सन्मानाने मी भारावून गेलो. कारण हा महाराष्ट्राचा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलावंतांकडून आजवर काही ना काही शिकता आले. हे विसरता येणार नाही. कलावंत या नात्याने मोठ्या शहरांमध्ये आम्ही नेहमीच जातो. या पुरस्काराच्या निमित्ताने लातूरसारख्या लहान शहरात येता आले. इथे शास्त्रीय संगीतासाठी सुरु असलेले प्रयत्न पाहता आले., याचे मला समाधान आहे.
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, गायन मुळातच कठीण आहे. त्याहून अधिक कठिण संगीत शिकविणे आ.हे.ही दोन्ही कार्य पं. अजय चक्रवर्ती मोठ्या खुबीने करतात, हे कौतुकास्पद आहे. आमची प्रत्यक्ष ही पहिलीच भेट असली तरी त्यांना अनेक वर्षांपासून मी ऐकत आलो आहे. त्यांना पुरस्कार देण्याची संधी मिळाली, हा माझाच एका प्रकारे गौरव आहे., असेही ते म्हणाले. पुरस्कार सोहळ्याआधी सरस्वती बोरगावकर यांचे गायन झाले. त्यांना अंबरीश शीलवंत (तबला), बाबूराव बोरगावकर (हार्मोनियम) यांनी साथ केली. त्यानंतर पं. अजय चक्रवर्ती यांचे सूरेल गायन अनुभवण्याची लातूरकरांना संधी मिळाली. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम), मेहेर परळीकर (तानपुरा) यांनी साथ दिली. प्रा. कल्पना देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
















