मुंबई : प्रतिनिधी
प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणा-या गरम व कोरड्या वा-यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. या कोरड्या वा-याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट २० जून उजाडण्याची शक्यता हवामान अभ्यासक अर्थेय शेट्टी यांनी व्यक्त केली.
मान्सून सीमा सध्या हर्णे, सोलापूर, हैदराबाद, धनबाद आणि मुजफ्फरपूर या भागातून जात आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, ओडिशा व छत्तीसगडच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे.
मात्र महाराष्ट्रात मान्सून येण्याचा वेग मंदावला आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात एकूण पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १४ ते १९ जून दरम्यान केवळ काही ठिकाणी किंवा तुरळक स्वरूपात पाऊस पडू शकतो.
















