पुणे : प्रतिनिधी
भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नेहमी जातीयवाद आणि धर्मभेद करत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत सहानुभूती घेण्याची सवय झाली असून त्या स्वत: जातीयवादात अडकल्या आहेत.
२६ जूनच्या कार्यक्रमातील कथित वादावर बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या की, त्या कार्यक्रमात मराठा किंवा ब्राह्मण असा कोणताही वादाचा मुद्दा उपस्थित नव्हता. मेधा कुलकर्णी या प्राध्यापक असताना नगरसेविका झाल्या आणि आज खासदार आहेत तेव्हापासून त्यांना ओळखते. त्यांचा स्वभाव अत्यंत हेकेखोर आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना फक्त मागच्या रांगेत बसायला सांगितले होते, पण केवळ तेवढ्यावरून त्यांनी नाहक त्रागा केला आणि वादाला तोंड फोडले. अभिमन्यू पवार हे कोणत्याही जातीमध्ये कधीच भेद करत नाहीत.
शहराच्या विकासासाठी काय केले
रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहराच्या विकासासाठी काय केले? पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे यावर मेधा कुलकर्णी या पुढे का आल्या नाहीत, असा सवाल ठोंबरे यांनी केला आहे. कोथरूडमध्ये समस्या सोडवताना तुम्ही कधी दिसत नाहीत, लोकांमध्ये जाऊन त्यांचे काम करताना तुम्ही दिसत नाही. केवळ संसदेत जाऊन भाषण करण्याचे काम तुम्ही करतात.
















