लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणा-या ३७ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची रविवार दि. २६ एप्रिल रोजी २३४ केंद्रावर दोन सत्रा मध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले असून शिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावरून परीक्षेच्या संदर्भाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी ची परीक्षा घेतली जाते. लातूर जिल्हयातील १ हजार ९४१ शाळांनी इयत्ता ४ थी च्या २१ हजार २२३ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरले आहेत. या विद्यार्थ्यांची जिल्हयातील १३१ केंद्रावर रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी १ हजार ३५१ हॉल निश्चित करण्यात आले आहेत. तसेच इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १६ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले आहेत. या विद्यार्थ्यांची रविवारीलातूर जिल्हयातील १०३ परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी १ हजार २७ हॉल निश्चित करण्यात आले आहेत.
दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार दि. २६ एप्रिल रोजी दोन सत्रामध्ये पार पडणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रथम भाषा व गणित विषयाची १५० मार्काची परीक्षा होणार आहे. तर दुस-या सत्रात दुपारी २ ते ३.३० या वेळेत तृतीय भाषा व बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची १५० मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारीही पूर्ण केली आहे. इयत्ता ४ थी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होणा-या विद्यार्थ्यास सलग तीन वर्ष ५ हजार रूपये शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मिळणार आहे. तर इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होणा-या विद्यार्थ्यास सलग तीन वर्ष ७ हजार ५०० रूपये शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मिळणार आहे.
















