निलंगा : प्रतिनिधी
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने निलंगा तालुक्यातील खरीप पिके धोक्यात आली असून, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उमरगा (हा.) येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तालुक्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाहणी दरम्यान शेतक-यांशी संवाद साधताना अभय साळुंके म्हणाले की, पावसाळा संपत आला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीनसह मोसंबी, केळी, ऊस, ज्वारी आदी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. तलाव व छोटे जलसाठे कोरडे पडत असून विहिरींच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच शेतकरी व शेतमजुरांसाठी रेशनची व्यवस्था, पशुधनासाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. या मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय न झाल्यास काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पाहणीनंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिका-यांना निवेदन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, जि.प. सदस्य प्रतिनिधी प्रमोद मरुरे, पंचायत समिती सदस्य
किरण पाटील, श्रीमंत जाधव, अभिजित उसनाळे, नगरसेवक अजित नाईकवाडे, सिराज देशमुख, प्रशांत वांजरवाडे, गणेश पेठकर, आंबादास जाधव, विठ्ठल पाटील, गंगाधर चव्हाण, किशोर कारखाने, माधवराव पाटील, विकास पाटील, चक्रधर शेळके,
बालाजी गोमसाळे, प्रा. रमेश मदरसे, अमोल बिराजदार, माधव वाडीकर, महेश तिवारी, गौतम सोनकांबळे हे उपस्थित होते.
















